शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कल्याण रिंगरोड प्रकल्प मे अखेर पूर्ण होणार

१२०० प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम सुरू, आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

कल्याण :  कल्याण – डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या ‘रिंगरोड प्रकल्पा’च्या कामाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. १२०० प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसननाचे काम सुरू झाले असून  रिंगरोड प्रकल्पाच्या कल्याणातील वाडेघर ते मांडा – टिटवाळा या टप्प्यादरम्यान विस्थापित होणारी घरे, मंदिरं, शेतजमीन आणि वृक्ष या महत्वाच्या अडचणी दूर झाल्याने हा प्रकल्प ठरलेल्या मुदतीत मे २०१२१ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
 भूसंपादन, प्रकल्पग्रस्त आदी मुद्द्यांवर महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाची गती मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना चर्चेसाठी बोलावले होते. आमदार भोईर, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्यासह या बैठकीला एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे आणि केडीएमसी नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादनासह विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पात बाधित होणाऱ्या चाळीतील घरांची संख्या जास्त असून त्यांच्या पुनर्वसनासाठी कंत्राटदाराला २ टीडीआर देण्यात येतील. त्यापैकी एका टीडीआरच्या माध्यमातून कंत्राटदाराने विस्थापितांसाठी चाळ बांधून देण्याची किंवा बांधलेल्या चाळी विकत घेऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. प्रकल्पात तुटणारी ७ मंदिरं शेजारील भागात बांधून देण्याचा आणि ताडाची झाडं जाणाऱ्या लोकांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले..

 338 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.