प्रयोगशील नाट्यनिर्माता दत्ता घोसाळकर यांचे दुःखद निधन

महाराष्ट्रात जेव्हा मराठी नाट्य – चित्रपट सृष्टी मान टाकून बसली होती अशाकाळात यदाकदाचित सारखं अतिशय धाडसी व थेट संवाद साधणार संतोष पवार लिखित नाटक रंगमंचावर दत्ता घोसाळकरांनी आणले होते.

ठाणे : ठाणे ही नाट्यपंढरी आहे. या नाट्यपंढरीच्या विविध विटांमध्ये मैलाचा दगड ठरलेला नाट्यनिर्माता दत्ता घोसाळकर यांचं काल अतिशय कमी वयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज दुपारी ठाण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाण्यातील अनेक मान्यवर व नाट्य चित्रपट सृष्टीशी संलग्न असलेले अनेक कलावंत, निर्माते आवर्जून उपस्थित होते. घोसाळकर यांच्या निधनाने खरंतर ठाण्याच्या नाट्यपंढरीमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी आपली हळहळ व्यक्त केलेली आहे. यदा कदाचित हे महाराष्ट्राच्या नाट्य पंढरीमधील मैलाचा दगड ठरणारं नाटक. लाली लीला या नावाचे सर्वांगसुंदर व आव्हानात्मक जुळ्या सयामी बहिणीचं नाटक दत्ताने पेललं होतं. महाराष्ट्रात जेव्हा मराठी नाट्य – चित्रपट सृष्टी मान टाकून बसली होती आशाकाळात यदाकदाचित सारखं अतिशय धाडसी व थेट संवाद साधणार संतोष पवार लिखित नाटक दत्ताने केलं. यावेळेला वेगळं काय केलं, तर हा प्रयोग होता प्रायोगिक रंगभूमीच्या नंतरचा एक वेगळा प्रयोग होता. आणि यात अक्षरशः कँटीनमध्ये काम करणाऱ्या मुलांपासून सर्व नवोदित कलावंत आणि त्यातही थोड्याफार अनुभवाचे कमलाकर सातपुते, समीर चौगुले यांसारखे लोक त्यांनी घेतले. लेखक संतोष पवार यांचाही तसा ब्रेकच होता. त्यांचा ही हा पहिलाच नाटक होता. हे नाटक सर्वांगसुंदर होत मात्र ते तेवढंच वादग्रस्त ठरलं. अगदी गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या खाली बाँबस्फोट करण्यापर्यंत हिंदुत्ववाद्यांना हे नाटक झोंबलं होतं. या नाटकाच्या पहिल्या दुसऱ्या प्रयोगातच वादळ उठले. सर्व हिंदुत्ववादी संघटनां या नाटकाच्या विरोधात एकवटल्या तर ठाण्यातील पत्रकार कैलाश म्हापदी यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असलेली फळी नाटकाच्या बाजूने उभी राहिली. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या कोर्टात या नाटकाच्या निर्णयाचा चेंडू होता. परंतु आनंद दिघेनी अतिशय सामंजस्य भूमिका घेतली. काही गोष्टी वगळायला लावल्या मात्र, नाटकाचा जीव जाऊ दिला नाही. हे नाटक जगलं आणि पुढे पाच हजार, दहा हजार म्हणजेच वस्त्रहरण नंतरच त्यातल्या त्यात इमोशनली ब्लॅक कॉमेडी या सदरात मोडणाऱ हे अतिशय दर्जेदार नाटक नंतर परत वाजत राहिलं, परत गाजत राहिलं, परत वादग्रस्त ठरत राहिलं. आम्ही पाचपुते वैगेरे आशा वेगवेगळ्या व्हर्जिनमध्ये हे नाटक अनेक पद्धतीने सादर करण्यात आले. दत्ताने अलीकडेच त्याचा दुसरा रिमेक वेगळ्या पद्धतीचा प्रायोगिक रंगभूमीवरती आणला होता. मात्र त्याही नाटकाचे शंभर प्रयोग झाल्यानंतर जे खरं यश आहे ते बघायला आज दत्ता या नाट्यसृष्टीमध्ये नाही. दत्ता घोसाळकर म्हणजे दत्त-विजय प्रोडक्शन या बॅनरखाली त्यांनी निला सत्यनारायण यांच्यापासून ते अतिशय कॉमेडीची आणि तेव्हढीच सिरीयस भावनाप्रधान नाटकं आणि प्रत्येक नाटकाचा वेगळा प्रयोग ठरेल अशा पध्दतीची नाटकं केली. आईचं घर उन्हाच, घर श्रीमंतांच, देहभान, वंदे मातरम, किमयागार सारखी नाटकं त्यांनी नाट्यरसिकांना दिली. तर यदाकदाचित ने इतिहास घडविला आणि म्हणूनच जिथे दोनशे वर्षांची नाट्यसृष्टीची परंपरा आहे त्याच नाट्यसृष्टीमध्ये संतोष पवार आणि दत्ता घोसाळकर ही दोन नावं घेतल्याशिवाय मराठी नाट्यसृष्टीला पुढे जाता येणार नाही. अर्थात एक चांगला ठाणेकर आणि ठाण्यातील कलावंतांची शान असलेला दत्ता घोसाळकर यांच्या आकस्मिक जाण्याने ठाण्याच्या कलावंतांच्या आणि सांस्कृतिक वाटचालीमध्ये अतिशय मोठी हानी झालेली आहे.

 431 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.