विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सल्ला
मुंबई : सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे. तेथे काम केले तर २०२१ पर्यंत आपण मुंबईकरांना मेट्रो देऊ शकतो. त्यामुळे अहंकार सोडून तेथे तत्काळ काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नसल्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले.
काही अधिकाऱ्यांना हे लक्षात आले की, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अहंकाराने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग केले आहे. या निर्णयामुळे मुंबई मेट्रोच्या निर्णयात खरे तर मुख्यमंत्र्यांनीच मिठाचा खडा टाकला. कांजूरला कारशेड नेले तरी आरे येथे काम करावेच लागणार आहे. जर तेथे बांधकाम करायचेच आहे, तर मग आरे येथे कारशेड नाही, हा हट्ट का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा आमच्यासाठी टीकेचा विषय नाही. आरेत काम सुरू करा, विजय आमचा की त्यांचा हे महत्त्वाचे नाही. मुंबईकर जिंकले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नवीन लोकांना चांगले भविष्य आहे, त्यांनी थोडे वाचन केले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. आपल्याच सरकारने दिलेल्या अहवालाचे वाचन केले पाहिजे. सौनिक समितीने स्पष्ट केले आहे की, ४.५ वर्षाचा विलंब आणि ५००० कोटींचा भूर्दंड हा कांजूरमार्गमुळे होणार आहे. आजच्या निर्णयाने राज्य सरकारला मोठी चपराक बसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
486 total views, 2 views today