कल्याणच्या डम्पिंगवर कचरावेचक लोकांनी अडवल्या कचऱ्याच्या गाड्या

डम्पिंगवर कचरा कमी येत असल्याविरोधात आंदोलन

कल्याण : डम्पिंगवर कचरा कमी येत असल्याविरोधात कचरा वेचक लोकांनी सकाळपासून कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्याचे दिसून आले. डम्पिंगवर येणारा कचरा कमी झाल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न विचारत या कचरा  वेचक लोकांनी आज सकाळी ७ वाजल्यापासून हे आंदोलन केले. त्यामुळे वाडेघर  डम्पिंग ग्राऊंड ते दुर्गाडी चौक परिसरात कचऱ्याच्या गाड्यांची मोठी रांग लागली होती.
वाडेघर डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने एप्रिल महिन्यापासून केडीएमसीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. त्याला कल्याण डोंबिवलीकर चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. परिणामी वाडेघर डम्पिंगवर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा बरेच कमी झाले आहे. मात्र याचा फटका गेल्या कित्येक वर्षांपासून डम्पिंगवरील कचऱ्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचक कुटुंबांना बसत आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन इकडे कचरा येत असून त्याद्वारे इथल्या कचरा वेचकांना पूर्वीपेक्षा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळत आहे.
याविरोधात आज सकाळी ७ वाजल्यापासून या कचरा वेचकांनी डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. कचरा वर्गीकरण केला जात असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून कचरा महापालिकेने वर्गीकरणाचे आम्हाला काम देण्याची या लोकांची मागणी आहे. दरम्यान हे आंदोलन मागे घेण्याबाबत महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना विनंती केली. अखेर केडीएमसी आयुक्तांनी भेटीची वेळ दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 476 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.