भावी शैक्षणिक वाटचाल आव्हानात्मक असेल – सुरेंद्र दिघे

नाखवा स्मारक पारितोषिक वितरण समारंभाने आनंद भारती समाजाच्या ११९व्या चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

ठाणे : १९८४ पासून मळलेल्या शैक्षणिक वाटा येत्या तीन वर्षात मोडीत काढण्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तुमच्या पुस्तकी ज्ञानाला आता महत्त्व देण्यात येणार नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून संपादन केलेले ज्ञानच बाजी मारणार आहे. या संक्रमणात मैदानावरचा विद्यार्थी हार-जीत कशी पचनी पाडायची हे खेळाच्या माध्यमातून शिकलेला असतो. गेल्या पाच पिढ्या सामाजिक व क्रिडा क्षेत्रात अग्रगण्य असलेली  आनंद भारती समाज संस्थेसारखी चिरंजीवी शतायुषी संस्था या तरूणांसाठी आधारवड ठरणार आहे. मुलांनो तुमची भावी शैक्षणिक वाटचाल खूप आव्हानात्मक असणार आहे. अशा आशयाचे मार्गदर्शनपर मनोगत “ठाणे भूषण” व जिज्ञासा ट्रस्टचे “प्रमुख विश्वस्त सुरेंद्र शांताराम दिघे. यांनी व्यक्त केले. श्री आनंद भारती समाज ठाणे या संस्थेतर्फे १२ रोजी शनिवारी सायंकाळी ११९ व्या चंपाषष्टी उत्सवास प्रारंभ झाला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र दिघे बोलत होते. यंदाच्या दहावी शालांत परीक्षेत ठाणे केंद्रातून २२ हजार २५६ उमेदवारांतून ९९.६०% गुण संपादन करून सर्वप्रथम आल्याबद्दल प्रियांका सुयश लिमयेचा ६९ वे यशवंतराव नाखवा तर याच परीक्षेत ९५.२०% टक्के गुण संपादन करून संस्थेत सर्व प्रथम आल्याबद्दल चार्वी सदानंद बागडी हिचा ६८ वे दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. सोबत ६० उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत कोळी उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर व कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सहकार्यवाहक माधुरी कोळी यांनी सूत्रसंचालन केले, कार्यवाह  संदीप कोळी यांनी अहवाल वाचन केले तर सुयश कोळी व ओमकार वैती यांनी परिचय करून दिला.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.