अँमेझॉन, फ्लिपकार्टची चौकशी करण्यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालय १८ जानेवारीला निर्णय देणार

कॉम्पेटीशन कमिशन ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याच्या विरोधात सीसीआयने दाखल केली होती याचिका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यासंदर्भात कॉम्पेटीशन कमिशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) आदेशाला दिलेल्या स्थगिती विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात कॉम्पेटीशन कमिशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणाची १८जानेवारी रोजी अंतिम सुनावणी घेऊन निकाल दिला जाईल असे एकल खंडपीठाने सांगितले.
आज झालेल्या सुनावणी दरम्यान एकल खंडपीठाने सर्व पक्षकारांची मते ऐकून घेतली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी सीसीआयसहित अँमेझॉन आणि फ्लिपकार्टने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) महाराष्ट्र चे उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. सुनावणीदरम्यान फ्लिपकार्टच्या वकिलांनी बाजू मांडताना कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सतर्फे (कॅट) मांडण्यात येणाऱ्या पुराव्यासदर्भात हरकत घेतली होती. त्यावर कॅटच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे खोडून काढत आक्षेप घेतला होता. त्यावर अँमेझॉनने दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू मांडण्यासाठी एकल खंडपीठाने कॅटला एक आठवड्याची मुदत दिली असल्याचे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
अँमेझॉन आणि फ्लिपकार्टने गत फेब्रुवारी महिन्यात सीसीआयने या दोन्ही कंपन्यांच्या कार्यपद्धतिची चौकशी करण्यासाठी दिलेल्या आदेशाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली होती. दिल्ली व्यापार महासंघ आणि कॅटने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत सीसीआयने हा आदेश दिला होता. हि स्थगिती उठवण्यासाठी सीसीआयने ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. २६ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी सीसीआयला कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्यास सांगून या प्रकरणी ६ आठवड्यात निर्णय देण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाला दिले होते.त्यानुसार आज झालेल्या सुनावणी दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने १८ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होऊन निकाल देणार असल्याचे सांगितले असे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.

 525 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.