खबरदार! महिला व बालकांवर अत्याचाराविरोधी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून २१ दिवसात खटला निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगत त्यासाठी स्वंतत्र न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास थेट फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली असल्याने आता अशा घटना रोखण्यास निश्चित मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मागासवर्गीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धर्ती देशभरातील सर्वच राज्यात होत असलेल्या महिला व बालकांवरील घटनांचा मुद्दा चर्चेस आला. त्यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे होत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यावर या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी दिशा कायद्याच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.
मागील दोन अधिवेशनात हे विधेयक आणले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी हे विधेयक आणणे शक्य झाले नाही. अखेर आगामी अधिवेशनात हे विधेयक आणण्याचे निश्चित करण्यात आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
488 total views, 1 views today