शहापूर-मुरबाडच्या कलाकारांची लहानग्यांसाठी खास भेट

धम्मक लाडू अल्बममधील “थंडी आली…!” हे उत्कृष्ट गीत

शहापूर : संगीत विश्वात अल्पावधीतच संगीतकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या शहापुरच्या मातीतील सुमेध जाधव या गुणी कलाकाराने संगीतबद्ध केलेलं”….थंडी आली!” हे गाणं खास बच्चेकंपनीसाठी संगीतबद्ध केले आहे.
या गीताच्या गीतकार डॉक्टर विजया होटकर या असून मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील कुमारी प्रियंका देसले हिने हे गीत अक्षरशः जिव ओतून गायले असल्याने कान लावून ऐकताना बच्चेकंपनी मात्र दिलखूष झाली आहे.
सामाजिक,शैक्षणिक,साहित्य व कला क्षेत्रात निपुण असलेल्या व साहसवीर म्हणून जिल्ह्यात लौकिक असलेल्या शेणवेच्या अभिजित चौधरी यांनी या गिताचे उत्तमरीत्या चित्रीकरण करून दृष्यांतील दर्जा एव्हरेस्टवर नेऊन ठेवला आहे.यातील दहा बालकलाकारांनी धमाल अभिनय साकारला असून रवींद्र पितळे यांनी साकारलेली रंगभूषा आणि नृत्यअभिनयासाठी विशाल घनगाव या दोघांची मेहनत तर अफलातूनच आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. सलग सुट्ट्या असतानाही अनेक बंधने असल्याने “ना मामाचा गाव,ना झुकझुक आगीनगाडी!” या मुळे अगोदरच कंटाळलेल्या बालमित्रांसाठी “….थंडी आली !” हे गीत मात्र धमाल उडवून देत आहे.
“आता बालगीत हा प्रकार हळू हळू नामशेष होत चालला असून सध्याच्या पिढीतील लहानग्यांना बालगीत हा प्रकार समजावा व त्याबद्द्ल आवड निर्माण व्हावी म्हणून नवीन गीते तयार करून “धम्मक लाडू!”हा अल्बम तयार केला असल्याचे संगीतकार सुमेध जाधव यांनी सांगितले.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.