अखेर घोडबंदर रोडवरील पाणीटंचाईचा प्रश्न लागला मार्गी

भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील लाखो नागरिकांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी स्टेम प्राधिकरणाबरोबर घेतलेल्या बैठकीत घोडबंदर रोडसाठी वाढीव १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील ब्रह्रांड, हिरानंदानी इस्टेट, वसंत लिला, विजय नगरी, वाघबीळ, कोलशेत परिसरासह संपूर्ण घोडबंदर रोड परिसरात जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यातच लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्य घरी असल्यामुळे पाण्याचा वापर वाढला होता. अशा परिस्थितीत कमी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी घोडबंदर रोडवरील रहिवाशांसाठी वाढीव १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. या संदर्भात ४ ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे बैठक झाली होती. त्यात १० दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आग्रह धरण्यात आला होता.
अखेर घोडबंदररोडवासियांची मागणी लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी काल घेतलेल्या बैठकीत स्टेम प्राधिकरणाला वाढीव १० दशलक्ष लिटर पाणी पुरविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणीटंचाई दूर होणार आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापौर म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार मानले आहेत.

 506 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.