किन्हवली येथे भात खरेदी केंद्राचे उदघाटन

मनोगतात सुभाष हरड, विनायक धानके व मारुती धिर्डे यांचा अधिकाऱ्याना सूचक इशारा

दोन वर्षे बारदानाचे पैसे न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना पांडुरंग बरोरा यांनी शांत केले

शहापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०२०-२१ या आधारभूत भात-नागली खरेदीच्या किन्हवली केंद्राचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत नायकाचापाडा येथे करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या भाताला हमी भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक-०२ संचलित प्रादेशिक कार्यालय जव्हार व उपप्रादेशिक कार्यालय शहापूर यांच्या वतीने २०२० व २१या वर्षीचे आधारभूत किंमत भात व नागली  खरेदीच्या किन्हवली केंद्राचे उद्घाटन आज माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. हे खरेदी केंद्र नायकाचापाडा येथे करण्यात आले.
या वेळी महामंडळाचे शहापूर कार्यालयाचे प्रादेशिक उपव्यवस्थापक आशिष वसावे यांनी प्रास्ताविक सादर करताना या केंद्रावर कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नसल्याचे सांगितले.
शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सुभाष हरड यांनी आपले मनोगत मांडताना सूचक इशाराच दिला.त्यांनी म्हटले की,”या कार्यक्रमात मी निमंत्रित पाहुणा असलो तरी भात खरेदी करताना शेतकऱ्यांना टाळून व्यापाऱ्यांना संधी दिली तर या भागात संघटीत झालेल्या शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यासाठी सर्वात पुढे मी असेल!”या विधानावर शेतकऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून हरड यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. माजी जिल्हा परिषद सदस्य व किन्हवली भात गिरणीचे चेअरमन विनायक धानके व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनीही मनोगत व्यक्त करताना महा मंडळाच्या अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे इशारा देत आपण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले.
आदिवासी विकास महामंडळाच्या भात  खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा मोबदला वेळेवर मिळत नसून सुमारे दोन वर्षांपासून बारदानाचे पैसे मिळालेच नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना शांत करून माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या वर्षीच्या बारदानाचे पैसे महामंडळाकडून मिळून देऊ अशी मध्यस्ती केल्याने शेतकरी शांत झाले.
  यावेळी व्यासपीठावर शहापूर पंचायत समितीचे उपसभापती जगन पष्टे,सदस्या पुष्पा बांगर,खरेदी विक्री संघाचे माजी सभापती दत्तात्रय दिनकर, संचालक विनायक सापळे,जि.प.सदस्य राजेंद्र विशे,उपतालुका प्रमुख विकास गगे,बाळकृष्ण विशे,विभागप्रमुख लक्ष्मण बांगर,युवा उद्योजक अविनाश साबळे,शांताराम सासे,बाळकृष्ण सासे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भरत घनघाव यांनी केले.

 563 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.