संपूर्ण आरोग्य यंत्रणा अद्ययावत ठेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड १९चा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. नागरी संशोधन केंद्र येथे कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी कोरोनाची दुसरी लाट येणाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असून सर्व हॉस्पिटल्स अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देतानाच रुग्णवाहिका, ऑक्सिजन योग्य पुरवठा, ऑक्सिजन बेड, अँटीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरात मास्क न वापरणाऱ्या तसेच सोशल डिस्टिंग न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून येत्या १० दिवसात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील साफसफाई कामाकडे दुर्लक्ष न करता प्रभाग समितीनिहाय दररोज परिसर साफसफाई,रस्ते, सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्यावतीने शाळेतील ७० टक्के शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चाचण्या देखील तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागास दिल्या असून येत्या काळात लसीकरण करण्यासाठी संपूर्ण आरोग्य सेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देखील आरोग्य विभागास दिल्या आहेत.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरुच ठेवून कोरोना संसर्गबद्दल नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे आदी उपस्थित होते.

68 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *