देशातील सुमारे १० लक्ष व्यापाऱ्यांनी सोशल साईट्सच्या माध्यमातून केला व्यापार


कोरोना काल सुरू झाल्यावर व्यापारी थेट ग्राहक बाजारात व्यवसाय करण्यास घाबरत होते.त्याचाच परिणाम, व्यवसायाचा एक मोठा हिस्सा ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांच्या ताब्यात गेला.अशा परिस्थितीत आपल्या व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी व्यावसायीक इतर पर्याय शोधत होते. त्यावेळी काही व्यावसायिकांनी सोशल साईट्सच्या माध्यमातून आपल्या नियमित ग्राहकांशी संपर्क राखला. त्याचा फायदा त्यांना नंतरच्या काळात मिळाला.

ठाणे : ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यासाठी देशातील व्यापाऱ्यांनी ई कॉमर्स साईट्सच्या जोडीने आणखी एक पर्याय शोधला आहे. देशातील व्यावसायिक आता व्हॉट्स अप, फेसबुक आणि इतर सोशल साईट्सच्या माध्यमातून ग्राहकांना माल विकत आहेत. अगदी किराणा मालाचे व्यापारीही सोशल साईट्सच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑर्डर स्वीकारत आहेत. सोशल साईट्सच्या माध्यमातून सुमारे १० लाखाहून अधिक व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. एकट्या मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात ( एमएमआरडीए) ही संख्या ५० हजाराहून अधिक असल्याचे कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
देशातील व्यापारी वर्गाची पालक संघटना असलेल्या कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) विविध राज्यातील व्यापाऱ्यांचा एक सर्व्हे केला. कॅटने १ ते ३० सप्टेंबर दरम्यान केलेल्या ४०, ८१६ व्यापाऱ्यांच्या सर्व्हेक्षणात सोशल साईट्सच्या माध्यमातून एका नव्या बाजाराची देशात वेगाने निर्मिती होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. देशातील सुमारे १७.९६ टक्के नवे व्यापारी, व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आता सोशल साईट्सचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. तर जुन्या व्यावसायिकांमध्ये हेच प्रमाण ३५.१९ टक्के एवढे असल्याचे पाह्यलं मिळाले. याशिवाय दुसऱ्या बाजूला नविन व्यावसायिकांनी १२.०४ टक्के एवढा व्यापार ऑफलाईन पद्धतीने केला असल्याचे या सर्व्हेक्षणात पहायला मिळाल्याचे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले.
दिवाळीच्या हंगामात सोशल साईट्सच्या माध्यमातून वैयक्तिक सामानांचा(१८.४५ टक्के), खाद्य आणि किराणा सामान(१६.५१टक्के), कपडे (१५.०९टक्के), इलेक्ट्रॉनिक(११.३७टक्के), आरोग्य विषयक(७.६०टक्के), घरगुती साफ सफाईचे सामान(४.५९ टक्के) आणि दागिन्यांची ३.८३ टक्के विक्री सोशल साईट्सच्या माध्यमातून झाली. त्यामुळे देशातील छोटे व्यावसायिक आता सोशल साईट्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवत आहेत. ही बाब देशातील व्यावसायिकांसाठी महत्वपूर्ण असल्याचे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. कोरोना काल सुरू झाल्यावर व्यापारी थेट ग्राहक बाजारात व्यवसाय करण्यास घाबरत होते.त्याचाच परिणाम, व्यवसायाचा एक मोठा हिस्सा ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांच्या ताब्यात गेला.अशा परिस्थितीत आपल्या व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी व्यावसायीक इतर पर्याय शोधत होते. त्यावेळी काही व्यावसायिकांनी सोशल साईट्सच्या माध्यमातून आपल्या नियमित ग्राहकांशी संपर्क राखला. त्याचा फायदा त्यांना नंतरच्या काळात मिळाला. आगामी काळात कॅट स्वतःचे भारत ई मार्केट नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरु करणार आहे. या पोर्टलमुळे व्यापाऱ्यांना विना कमिशन आणि ट्रान्सपोर्ट चार्ज न देता थेट ग्राहकापर्यंत आपला माल पोहचवता येणार असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.

 394 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.