पत्रिपुलाच्या कामादरम्यान अतिरिक्त बससेवा पुरवणार

पत्रीपूल गर्डर लॉंचींगवेळी पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा
कल्याण : बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉचींगच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांना प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आज आढावा घेतला. या बैठकीत ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकांच्या परिवहन विभागाकडून आणि एस.टी. महामंडळकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत एम.एस.आर.डी.ए. चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, रेल्वे रिजर्व फोर्सचे अधिकारी, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासहित संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
 कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ – कल्याण – भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या लौंचिंग प्रक्रियेकरिता २१ व २२ नोव्हेंबर २०२० रोजी दोन दिवस प्रत्येकी ४ तासांचा मेगाब्लॉक मिळावा यासाठी मागील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाठवपुरावा केला होता. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी ४ तास असा एकूण ८ तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी ३ तास असा ६ तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
 परंतु, या कामा दरम्यान २५० लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचे आज झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. सदर समस्या सोडवण्याकरिता करावयाच्या पर्यायी वाहतूक उपाययोजना , त्याचबरोबर गर्डर लॉंचींगचे काम सुरक्षितपणे करण्यासाठी आज रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे रिझर्व्ह फोर्स, स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्यासहित संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात, नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे  – नवी मुंबई  आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त एस.टी. बसेस  आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने तात्पुरता स्वरूपात खाजगी वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या कामाच्या दरम्यान सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध ठेवण्याची सूचना डॉ. शिंदे यांनी केली.    

 427 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.