दूरस्थ शिक्षणात ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल १०० टक्के

पदवीधरांच्या यादीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचे निकाल जाहीर

ठाणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा १०० टक्के लागला आहे. कला शाखेतून राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ७७.२५ टक्के गुणवून उत्तीर्ण झाले आहेत, तर श्रीमती सुमन काकडे यांना ७७.७५ टक्के गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमात वैष्णवी म्हात्रे (८१.८३ टक्के), दर्शन नेरकर (७६.५८ टक्के), मराठी माध्यमात अरुण दिवेकर (७१.४२ टक्के) व दिनेश शाहबाजे (६९.८३ टक्के) हे विद्यार्थी अंतिम वर्षाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
ज्ञानपीठ विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल १०० टक्के लागतो. याही वर्षी विद्यालयाने आपली परंपरा कायम राखली असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे विद्यालयाचे प्राचार्य सतीश दोडके यांनी सांगितले. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. विविध कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडावे लागलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेली अनेक वर्षे कार्यरत असून या माध्यमातून अनेकांनी आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दरवर्षी अंतिम वर्ष पदवी परीक्षा मे महिन्यात होतात; परंतु यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या, असेही प्रा. दोडके यांनी सांगितले.
ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु, संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ कायम होती. त्यामुळे सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुन:श्च श्री गणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो, याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेलेल्या माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार आहे, असेही ते म्हणाले.

 283 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.