राज्यात कंत्राटदारांची दिवाळी अंधारात

तत्काळ देयके न मिळाल्यास २५ नोव्हेंंबरपासून काम बंद आंदोलन

ठाणे : राज्यातील सर्व शासकीय विभागांकडे काम करणार्‍या कंत्राटदारांच्या कामांची बिले गेल्या आठ महिन्यापासून थकलेली आहेत. त्यामुळे राज्यभरातील जवळपास ३ लाख कंत्राटदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बिले मिळाली नसल्याने कंत्राटदारांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळे दिवाळी आधी थकीत पैसे न मिळाल्यास २५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले आणि कार्याध्यक्ष संजय मैंद यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला आहे.
कंत्राटदारांनी शासकीय विभागांची कामे कोरोनाकाळातही केली आहेत. मात्र, आठ महिन्यांपासून त्यांना देयके देण्यात आलेली नाहीत. या संदर्भात सुमारे १६ विनंतीवजा पत्र संघटनेने राज्य सरकारला दिले आहेत. नोव्हेंबर २०१९ पासून सर्व विभागाकडे काम करणार्‍या कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. मार्च २०२० पर्यंत कोविड सुरू झालेला नव्हता. मात्र शासनाने हेच कारण पुढे करीत लहानमोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांची देयके देण्यासाठी निधीच दिला नाही. त्यामुळे राज्यभरातील ३ लक्ष कंत्राटदार व त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३.५ हजार कोटी, ग्रामविकास विभागाचे ७५० कोटी, २५१५ लेखाशिर्षचे ४०० कोटी, नगरविकास विभागाचे २७०० कोटी, जलसंपदा विभाग ६१५ कोटी, एवढ्या मोठ्या प्रमाणात देयके शिल्लक आहेत. त्यामुळे कंत्राटदारांसह त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारवर्गाचीही दिवाळी अंधारा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही देयके तत्काळ न दिल्यास २५ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला आहे.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.