महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचा निर्णय, पहिल्या रात्री ८३२ प्रवाशांची चाचणी
ठाणे : कोरोनाचा कोव्हीड १९ चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून आता कालपासून ठाणे स्टेशनवर रात्रभर अँन्टीजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही चाचणी सुरु करण्यात आली असून पहिल्या रात्री ८३२ प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गेल्या काही महिन्यांपासून स्टेशनवर बाहेरील राज्यातून येणाऱ्या श्रमिक व प्रवाशांची ठाणे रेल्वे स्टेशनवर अँन्टीजन चाचणी करण्यात येते. परंतू सध्या रात्रीच्यावेळी बाहेरील राज्यातून शहरात येणाऱ्या प्रवांशाची संख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे पदाधिकारी, तसेच नगरसेवक यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची रात्रीच्या वेळी अँन्टीजन चाचणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी घेतला होता.
ठाणे स्टेशनवर यापुढे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यत बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार असून काल पहिल्याच रात्री एकूण ८३२ प्रवाशांची अँन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. एकूण ३ पथकांच्या साहाय्याने ही चाचणी करण्यात येत आहे.
470 total views, 1 views today