बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांची शपथ घेऊन सांगा ठाणे महापालिकेच्या कारभारात अनियमितता घडून भ्रष्टाचार झालेला नाही का?

ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक कृष्णा पाटील यांचा सवाल

स्थायीसभा आणि महासभा वेबिनार पद्धत रद्द करून पूर्ववत सबंधित सभागृहात घेण्याची मागणी

ठाणे : महापालिकेच्या कारभारातील अनियमितता घडवून घडविलेले भ्रष्ट्राचार उघड होवू नयेत आणि कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार कोरोंना संसर्गच्या नावाखाली लपविता यावेत यासाठी स्थायी समिती सभा अद्यापही पूर्वीप्रमाणे सभागृहात घेतली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री, महापौर, स्थायी समिती सभापती यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांची शपथ घेवून सांगावे की ठाणे महापालिकेच्या कारभारातील अनियमितता घडून भ्रष्ट्राचार झालेला नाही ? असा घणाघाती सवाल भाजप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सत्ताधाऱ्याना विचारला आहे.
त्यांनी या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र लिहून आगामी स्थायी समिती सभा सभागृहात घेण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करून देखील पालिका सभा घेण्यास अनुकूल नसल्याचे वास्तव उघड झाल्याने पाटील यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे ठाणे महानगर पालिकेची आतापर्यंत सर्व सभा बैठका मीटिंग वेबिनार वर घेण्यात आलेले आहे. परंतु आता विधानसभा अधिवेशन संसदेचे अधिवेशन आणि शासनाचे विविध कार्यक्रम पण सभागृहात होत आहेत. तसेच बाजारपेठा, कार्यालये, मॉल, स्वीमिंग पूल, व्यायाम शाळा देखील लोकांसाठी पूर्ण क्षमतेने खुले केलेल्या आहे, आणि शिवाय सिनेमा गृह खुल्ली करण्याची परवानगी देखील दिलेली आहे. बेस्ट बसेस आणि एस टी च्या बसेस पूर्ण प्रवाशी क्षमतेने वाहतूक करतात, रेल्वे लोकलमध्ये पण पूर्वीप्रमाणेच गर्दी असते. मग प्रवाशांना, नागरिकांना, आमदार खासदार यांना कोरोंना संसर्ग होत नाही. पण ठाणे महापालिकेची विविध प्रशस्त सभागृहे असताना ही महापालिकेच्या विविध सभा आणि मीटिंग आयोजित करताना कोरोंना लागण नगरसेवक आणि महापालिका अधिकारी यांना कशी होवू शकते ? का असा सवाल कृष्णा पाटील यांनी केला आहे.
मिशन बिगिन अगेन राबविताना सर्व ठिकाणी वावर मुक्त केलेला असताना ठाणे महापालिकेच्या मा स्थायी समिती सभा आणि मा महासभा वेबिनार पद्धत रद्द करून पूर्ववत सबंधित सभागृहात घेण्यासाठी प्रशासनाला आणि राज्य शासनाला कोणती भीती वाटते ? असे काही सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
त्यामुळे आगामी नोव्हेंबर २०२० च्या स्थायी समिती सभा आणि महासभा वेबिनार पद्धत रद्द करून पूर्ववत सबंधित सभागृहात नाही घेतल्यास सबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि वेबिनार वर होणाऱ्या सभेच्या कामकाजावर ( पाणी आरोग्य स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवा आणि त्यांचे कामकाज वगळून इतर बाबत ) आमची हरकत असेल याची नोंद घ्यावी असे पत्राद्वारे ठणकावून सांगितले आहे.

 526 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.