महावितरणचा शहरी भागात ‘एक दिवस, दहा रोहित्र’ उपक्रम

देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्न

कल्याण :  देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने कल्याण परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम सुरु झाला आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमांतर्गत शहरी भागात ‘एक दिवस, दहा रोहित्रे’ ही संकल्पना राबविण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यात प्रत्येक उपविभागात दर आठवड्याला दहा रोहित्रांची निवड करून अधिक मनुष्यबळाच्या मदतीने एका दिवसात या रोहित्रांच्या देखभाल दुरुस्तीची सर्व कामे केली जात आहेत. यातून संबंधित रोहित्रावरील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.
कल्याण परिमंडलांतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रमातून वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसह नवीन वीजजोडणी व वीजबिलांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येते. या उपक्रमाचा शहरी वीज ग्राहकांनाही लाभ मिळावा, या हेतूने यात आता ‘एक दिवस, दहा रोहित्र’ या संकल्पनेची भर टाकण्यात आली आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी तसेच अर्थिंग तपासणे, पिन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण पेट्यांची आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता, किटकॅट बदलणे, अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या व वेली दूर करणे याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी तारा सरळ करणे व तारांमध्ये स्पेसर्स बसविणे आदी कामे सुरु आहेत. या उपक्रमात शहरी भागातील सर्वच वीज वितरण रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून संबंधित रोहित्रांवरील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मोलाची मदत मिळेल.  कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, वसई, विरार, बोईसर, अंबरनाथ, बदलापूर, पालघरसह परिमंडलातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

 484 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.