जिल्ह्यात ८९ हजार १२६ बालकांचे लसीकरण

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बुथवरील ८५ टक्के लसीकरण पूर्ण

ठाणे  :  ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत रविवारी राबविण्यात आलेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून बुथवर ८९ हजार १२६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याने ८५ टक्के लसीकरण काम पूर्ण झाले. काही कारणास्तव ज्या बालकांचे लसीकरण रविवारी होऊ शकले नाही अशासाठी आरोग्य विभागामार्फत पुढील पाच दिवस आय पी पी आय मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी दिली.
या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती , आरोग्य कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य करून कोव्हिडं काळात देखील लसीकरणाचे सुव्यवस्थित काम केले.
रविवारी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली येथे  जिल्हास्तरीय उप राष्ट्रीय  पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. तर आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी तालुक्यातील वळ अंगणवाडी केंद्र येथे पल्स पोलिओ मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते आणि आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली  मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यातील १ लाख ५ हजार १० बालकांच्या  लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी  एकूण बुथ १ हजार १९३ उभारण्यात आले होते. तर  २ हजार ७५४ टीम कार्यरत होत्या.  तसेच १५७ मोबाईल टीम कार्यरत होत्या. या संपूर्ण मोहिमेत ९ हजार ४१८ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून ही मोहीम राबविण्यात येत आली. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हा आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले होते.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.