पत्रीपुलाच्या संथगती कामाविरोधात स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी रस्त्यावर

समस्या लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा   
कल्याण : कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या कल्याणच्या जुन्या पत्रीपुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून संथगतीने सुरु असून यामुळे वाहन चालकांना, स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांसह भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी हातात काळे फलक घेऊन निषेध आंदोलन केले. तर वाहतूक कोंडीची हि समस्या लवकरात लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रेखा चौधरी यांनी दिला आहे.      
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सध्या नागरिक वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करत आहेत. कल्याण शिळफाटा रस्ता, कल्याण श्रीराम चौक रस्ता, कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलावर होणारी वाहतूक कोंडी, वालधुनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. एकीकडे जुन्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरु असतानच प्रशासनाकडून कल्याण पूर्वेतील स्वर्गीय आनंद दिघे पुलाजवळील रस्त्याचे काम सुरु केले. हा रस्ता पूर्णपणे बंद असल्याने पत्रीपुलाच्या रस्त्यावर संपूर्ण ताण येत आहे. डोंबिवली कडून ९० फुटी रस्त्यावरून येणारी वाहने, दुसरीकडे कल्याण शिळ मार्गावरून येणारी वाहने यामुळे पत्रीपुलावर तासांतास वाहनचालक आणि नागरिक अडकून राहतात. याचा जास्त फटका पत्रीपुलाजवळील स्थानिक नागरिकांना बसत आहे. रस्त्यावर होणारी ट्राफिक आणि उडणारी धूळ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
 याविरोधात स्थानिक भाजपा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या नेत्तृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. नागरिकांच्या हातात समस्या मांडणारे काळे फलक घेत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.  आमच्यामुळे इतरांच्या त्रासात भर पडू नये त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. ९० फुटी रस्त्याचे अर्धवट काम आणि पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाहीतर आम्ही प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा नगरसेविका रेखा चौधरी यांनी दिला आहे.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.