महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश, दर मंगळवारी होणार आढावा बैठक
ठाणे : केंद्र शासनाच्यावतीने सन २०२१ साली करण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिका-यांनी सूक्ष्म नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देतानाच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. दरम्यान दर मंगळवारी स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची आढावा बैठक घेण्यात येणार असून जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये सुरु झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी आज ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्यावतीने सन २०२१ साली होणा-या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत विविध घटकांची चर्चा करून त्यातील घटकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत ठाणे शहर सहभागी झाले आहे. ठाणे शहराला ‘स्वच्छ ठाणे’ ‘सुंदर ठाणे’ बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून महापालिकेच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांनी कशा पद्धतीने या मोहिमेत काम केले पाहिजे याबाबत महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी या बैठकीत निर्देश दिले. यावेळी शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था,पाणी पुरवठा,तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देतानाच ज्या ठिकाणी शौचालये दुरूस्ती करण्याची गरज आहे ती तातडीने दुरूस्ती करावीत असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
केंद्र शासनाच्या नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरिता विविध कार्यक्रम राबवून शहरातील विविध संस्था, नागरिक, तसेच विद्यार्थी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्याचा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
449 total views, 3 views today