कोरोना चाचणी आता ९८० रुपयात होणार

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घटआरोग्यमंत्री राजेश टोपे


          मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. ४५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

 291 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.