खडसेंची भविष्यवाणी आणि भाजपा समर्थक विद्यमान आमदार शिवसेनेत

मिरा-भांईदरमधील माजी आमदार मेहताच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय

मुंबई : भाजपामधील अंतर्गत असंतोष एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने बाहेर उफाळून आल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार तथा मुळच्या भाजपाच्या मात्र आता समर्थक असलेल्या गीता जैन यांनीही भाजपाची साथ सोडत थेट शिवसेनेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
राज्यात भाजपा पक्ष संघटनेचा कारभार एकाच व्यक्तीच्या हाती एकवटला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही फारसे अधिकार नसल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी नुकतेच केले. तसेच सध्या पक्षात त्याच व्यक्तीचे सर्व चालते असा आरोप करत आपल्यानंतर भाजपामधील अनेकजण पक्षाचा त्याग करतील असे भाकित केले. त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही, तोच मुळच्या भाजपाच्या मात्र बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक लढवून जिंकणाऱ्या गीता जैन यांनी आज भाजपाच्या कमळाला सोडत शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेतल्याने खडसेंची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे स्पष्ट झाली.
मीरा-भाईंदरमध्ये माजी आमदार मेहता यांच्या इशाऱ्यावर तेथील भाजपाचे कामकाज चालते. तसेच तेथील इतरांना कोणतेच स्थान नाही. त्यांच्याच भ्रष्ट कारभारामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब होत आहे. तर शहरात अनेक अनधिकृत इमारती उभारल्या. त्यां विरोधात गीता जैन यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. तसेच त्यांच्या भ्रष्ट आणि दादागिरीच्या वागणूकीच्या विरोधात पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांकडे त्यांनी दाद मागितली होती. मात्र त्याची दखल पक्षाने घेतली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पक्ष सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास मोठ्या प्रमाणार भाजपामधील अनेक आमदार उत्सुक असल्याची चर्चा यापूर्वीच सुरु झाली आहे. त्यातच आता एकनाथ खडसे यांनीही यासंदर्भात भविष्यवाणी केल्याने आता पुढील आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

 341 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.