मदत करणार, पण लोकप्रियता, टाळ्यांसाठी घोषणा करणार नाही

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

उस्मानाबाद : मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे, त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. मात्र सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ही उपस्थित होते. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अतिवृष्टीतील नुकसान मोठे आहे. मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही, पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल असे सांगत विमा कंपन्यांशी देखील बोलून घेत आहोत. केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे, तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन पूर्णपणे पाठीशी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. धीर धरावा, हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

 330 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.