नवीन वीजजोडणी न मिळाल्यास थेट तक्रार करा

अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क करून तक्रार करण्याचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचे आवाहन
कल्याण : सर्व बाबींची पूर्तता व पैसे भरून ५ ऑक्टोबरपर्यंत प्रलंबित असलेल्या नवीन वीजजोडणीच्या अर्जदारांना (कृषी वगळता) २० ऑक्टोबरपर्यंत जोडणी देण्याबाबत मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सूचित केले होते. त्यासाठी आवश्यक वीज मीटरही पुरविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित अर्जदारांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. या निकषातील पात्र कल्याण परिमंडलातील अर्जदारांना अद्याप नवीन वीजजोडणी मिळाली नसल्यास त्यांनी थेट अधीक्षक अभियंत्यांना संपर्क करून तक्रार करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.
कल्याण परिमंडळात ५ ऑक्टोबरला थ्री-फेज वीज जोडणीसाठी २ हजार ४०० तर सिंगल फेज जोडणीसाठी ४ हजार ६०० अर्ज प्रतीक्षेत होते. प्रतीक्षेतील थ्री फेजच्या अर्जदारांना वीजजोडणी देण्यासाठी १०-४० अँपीयरचे २ हजार नवीन मीटर ५ ऑक्टोबरलाच क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग करण्यात आले होते. यात कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत कल्याण व डोंबिवलीसाठी १ हजार ४८८, कल्याण मंडल कार्यालय दोनमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर भागासाठी २०८, वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे परिसरासाठी २२६ तर पालघर मंडल कार्यालयातील पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरासाठीच्या ७८ मीटरचा यात समावेश होता. तर कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत प्रत्येकी ३ हजार व वसई आणि पालघर मंडल कार्यालयांसाठी प्रत्येकी दोन हजार असे एकूण १० हजार नवीन सिंगल फेज मीटर वितरित करण्यात आले होते.
महावितरणने साधनसामग्रीच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया इआरपीच्या (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून यापूर्वीच ऑनलाइन केली आहे. त्यामुळे मीटरची उपलब्धतता व पुरवठा प्रक्रिया पारदर्शक व गतिमान बनली आहे. प्रलंबित अर्जदारांना २० ऑक्टोबरपर्यंत जोडणी देऊन इआरपी प्रणालीत त्याची नोंद करण्याच्या सक्त सूचना मुख्य अभियंता अग्रवाल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना देऊन या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या आदेशानुसार नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
५ ऑक्टोबरपर्यंतच्या प्रलंबित अर्जदारांपैकी कोणाला वीजजोडणी मिळाली नसल्यास, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित अधीक्षक अभियंत्यांशी (कल्याण एक- ८८७९६२७१११, कल्याण दोन- ८८७९६२७२२२, वसई- ७८७५७६०९९९, पालघर- ७०६६०३००७७) संपर्क करून तक्रार करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे. या तक्रारींत तथ्य आढळ्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे

 406 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.