नगरसेवकांप्रमाणे सामान्य नागरिकांना देखील ५० लाखांची मदत करा ‘आप’ची मागणी

आयुक्तांनी भेट नाकारल्याने मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मांडला ठिय्या
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.  त्याच न्यायाप्रमाणे कोरोनामुळे  बळी पडलेल्या ९७० नागरिकांच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली असून या मागणीसाठी आलेल्या आप च्या शिष्टमंडळाला पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने आप च्या पदाधिकाऱ्यानी पालिका मुख्यालयात ठिय्या मांडला.
        कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरांनी कोरोनाने निधन झालेल्या महापालिकेच्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑक्टोबरपर्यंत कोरोनाने महापालिका क्षेत्रातील सुमारे ९७० नागरिकांचा बळी गेला आहे. हे सर्वच करदाते नागरिक असून ते सर्वच सधन घरातील आहेत असे नाही. कोरोनाला बळी पडलेल्या या ९७० नागरिकां प्रतीही महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहवेदना व्यक्त करीत त्यांच्याही कुटुंबियांना, तसेच यापुढेही जे कल्याण-डोंबिवलीकर नागरिक कोरोनाने मृत पावतील त्यांच्या कुटुंबियांना देखील ५०-५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे लक्षात घेता महापालिका हे एक कुटुंब असल्याने प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून नगरसेवक वा नागरिक असा भेदभाव न करता समान न्यायी तत्वाने व दृष्टीने महापालिका क्षेत्रातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या कल्याण-डोंबिवलीकर नगरसेवक आणि नागरिकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन तो त्वरेने अंमलात आणावा अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी दिली.

 445 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.