न.मुं.म.पा.च्या कामांची कंत्राटे प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांनाच

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा आक्रमक पवित्रा, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना डावलल्यास आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई: नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला दिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची कामे रद्द करून सदरच्या कामांचे कंत्राट स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देणेबाबत तसेच साफसफाईच्या ९६ कामांचे देण्यात येणारे कंत्राटही जुन्या स्थानिक प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार पाहता सदर ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे लायसन्स जप्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचे काम जर महापालिका प्रशासन करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी न.मुं.म.पा. आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदरची दोन्ही कंत्राटे ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत प्रथम प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. उद्यान विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती नेमली असून लवकरच सदरबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सांगत दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई शहर विकसित करण्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांची १००% जमीन दिली आहे. नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा खूप मोठा हात असताना त्यांनाच डावलून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. महापालिकेला मिळालेले स्वच्छतेचे पुरस्कार हे प्रकल्पग्रस्तांमुळेच मिळालेले असूनही त्यांना नामशेष करण्याचा डाव महापालिका आखत आहे. परंतु हे कदापि सहन करणार नसून नवी मुंबईवर पहिला हक्क हा स्थानिक भूमीपुत्रांचा असल्याने जर त्यांना कामांमध्ये पुन्हा डावलण्यात आले तर यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही असे म्हणत आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले जाणार असल्याचेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी न.मुं.म.पा. आयुक्त  अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व प्रशासन उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.

 296 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.