त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करा

बोगस डॉक्टराप्रमाणे महापालिकेतील चुकीच्या पध्दतीने बढतींची खैरात घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोवीड सेंटरमध्ये तीन बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. परंतु अशा प्रकारे ठाणे महापालिकेतही असे काही अधिकारी आहेत, ज्यांची पात्रता नसतांनाही त्यांना उच्च पदांची खैरात देण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यांची आणि त्यांना चुकीच्या पध्दतीने बढती देणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेने गोरगरीब रुग्णांसाठी कोवीड सेंटर सुरु केले आहे. परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारे तीन बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यांच्याकडून किती रुग्णांवर उपचार झाले, किती रुग्ण दगावले याची माहिती आता मिळणे गरजेचे आहे. शिवाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावीच परंतु इतर कोवीड सेंटरमध्ये देखील असे डॉक्टर आहेत, का? याचीही चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. डॉक्टरांची नेमणुक करण्यासाठी खाजगी एजेन्सी नेमण्यात आली होती. परंतु डॉक्टरांची नियुक्ती करतांना या एजेन्सीने डॉक्टरांची पात्रता तपासली होती का? याचीही चौकशी होणे आता गरजेचे आहे. विशेष म्हणजे आता ज्या ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले होते त्या कामात देखील भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे ज्या पध्दतीने महापालिकेने बोगस डॉक्टर शोधून काढले, त्याच पध्दतीने महापालिकेत देखील असे काही कर्मचारी किंवा अधिकारी आहेत, ज्यांची पात्रता नसतांनाही त्यांना कोणत्या निकषावर पदोन्नती किंवा बढती देण्यात आली, याची देखील चौकशी होणो आता गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या पध्दतीने बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करण्यात आला, त्याच पध्दतीने महापालिकेतील या चुकीच्या पध्दतीने बढतींची खैरात घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील त्यांनी या निवदेनाद्वारे केली आहे.

 382 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.