बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

दिडतासात १९७ रिक्षा चालकांवर कारवाई, १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

कल्याण :  कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ६०० रिक्षांची तपासणी करत नियम मोडणाऱ्या १९७ रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई  करण्यात आली. यातून १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
       कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांकडून रिक्षा चालकांना वारंवार सूचना देऊन देखील काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून मुजोरी सुरुच होती. या पार्श्वभूमीवर आज कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात कल्याण परिमंडळ ३  चे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अशोक पोवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा, वाहतुक पोलिसांचे पथक दाखल झाले.
स्टेशन परिसारत चार ही बाजूनी कडेकोट बंदोबस्त करत सर्व रिक्षा एस.टी. डेपोत वळविण्यात आल्या. याठिकाणी रिक्षांची तपासणी करत मास्क न घालणाऱ्या, बेशिस्त पणे पार्किंग करणाऱ्या, युनिफॉर्म न घालणाऱ्या, बस डेपो मध्ये प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळी ५ च्या सुमारास दिड तासांत तब्बल ६०० रिक्षांची तपासणी करत १९७ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले.

 494 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.