ऑनलाईन परीक्षाविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे धरणे आंदोलन

ऑनलाईन परीक्षा सुरु असताना इंटरनेट गायब होणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार होत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा मानसिक छळच होत असल्याचा केला आरोप

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, अद्ययावत साधनांच्या अभावी परीक्षांचा घोळ सुरु झाला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला बळी पडावे लाागत आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने धरणे आंदोलन केले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी विद्यापीठांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली होती. तर, कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ऑनलाईन परीक्षा सुरु असताना इंटरनेट गायब होणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार होत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा मानसिक छळच होत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कांबळे यांनी, ‘राज्यपालांनी कुलपती या नात्याने विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मध्यममार्ग काढावा, अशी मागणी केली.
या धरणे आंदोलनात प्रमुख उपस्थिती कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे साहेब नवी मुंबई अध्यक्ष अक्षय बोराडे, ठाणे शहर कार्याध्यक्ष शाहरुख सय्यद, कळवा मुंब्रा विधानसभा कार्याध्यक्ष सम्राट पांडे, कळवा विभाग सचिव सुमेध ठाणेकर, फैजान खान, अबिद खान, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप सामजिक न्याय विभाग कैलास हावळे,आदी सहभागी झाले होते.

 265 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.