नवरात्रीच्या दिवशी एकाच रुग्णालयात ९ मुलींचा जन्म

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयात ९ मुलींचा जन्म झाला. त्यामूळे जणू काही ९ जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.

कल्याण : नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणातील वैष्णवी रूग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असाच ठरला. या रुग्णालयात शनिवारी एकाच दिवशी तब्बल ९  मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे.
कल्याणातील डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे. शनिवारी त्यांच्या रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ११ महिलांची प्रसूती करण्यात आली. ज्यामध्ये ११ पैकी ९ महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. विशेष म्हणजे कालपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयात ९ मुलींचा जन्म झाला. त्यामूळे जणू काही ९ जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी ११ प्रसूती होणं तशी नवीन गोष्ट नाहीये. मात्र एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ९ मुलींचा जन्म होणं ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचेही डॉ. पूजा कोळी यांनी सांगितले. या ९ मुलींसह इतर २ मुलांची आणि त्यांच्या आईची तब्येत ठणठणीत असून एकाच दिवशी झालेल्या ९  मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

 557 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.