हाजुरी मुख्य रस्त्याचे काम सुरू करुन बाधितांचे तातडीने पुनर्वसन करा


नगरसेवक तथा शिक्षण सभापती विकास रेपाळे यांची मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या एकात्मिक रस्तारुंदीकरण मोहिमेतंर्गत फेब्रुवारी २०१७ मध्ये हाजुरी येथे १८ मीटर रस्तारुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून अद्याप हे काम पूर्ण होऊ न शकल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या कामासाठी बाधित झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनवर्सन करण्यात आलेले नाही त्यामुळे तात्काळ हाजुरी मुख्य रस्त्याचे काम सुरू करुन बाधितांचे तातडीने पुनर्वसन करा अशी मागणी नगरसेवक तथा शिक्षण सभापती विकास रेपाळे केली आहे.
या रस्त्याचे रस्तारुंदीकरणाचे काम सुमारे दोन वर्षापूर्वी सुरू झालेले असून आजतागायत तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचे रुंदीकरण पुढे सरकलेले नाही. रस्त्याचे रुंदीकरण करत असताना तांत्रिक अडचण उदभवलेली असून त्यामुळे हे काम गेले अनेक महिने रखडलेले आहे. तसेच या रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या ३३ पात्र बिगर निवासी बाधितांचे आजतागायत पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, याबाबत नागरिक अनेक तक्रारी करत असून त्यांच्या तक्रारी रास्त असून त्याचे निराकरण होणे गरजेचे असल्याचे रेपाळे म्हणाले.
या रस्तारुंदीकरणामध्ये बाधित गाळेधारकांचे पुनर्वसन देखील अजून प्रलंबित आहे. या पुनर्वसनाबाबत महापौर यांनी महासभेमध्ये तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिलेले होते. त्याची देखील अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. या गाळेधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना तातडीने न्याय देणे गरजेचे आहे. तसेच या संदर्भात महापौर यांचे दालनात सुनावणी देखील झाली व महापौरांनी तातडीने पुर्नवसन करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर सदर अंमलबजावणी प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या तांत्रिक अडचण दूर करुन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन करा अशी मागणी रेपाळे यांनी पत्राद्वारे, महापलिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित अधिकारी वर्गाकडे केली आहे.

 344 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.