या अभय योजनेचा कालावधी १५ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत असून यामध्ये १५ ऑक्टोंबर रोजी थकबाकी असणाऱ्या सर्व करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येणार
कल्याण : कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक वर्षांपासून थकीत असलेली मालमत्ता कराची रक्कम वसूल होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या तसेच महापालिकेचा कॅश फ्लो सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या थकीत करदात्यांसाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरसकट १०० टक्के शास्ती माफ करणे हे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणारे असल्याने यामुळे करदात्यांमध्ये कर न भरण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सन २०२०-२१ साठी अभय योजना लागू करण्यात येत आहे. या अभय योजनेचा कालावधी १५ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत असून यामध्ये १५ ऑक्टोंबर रोजी थकबाकी असणाऱ्या सर्व करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराच्या मागणीची रक्कम शास्तीची २५ टक्के रक्कम एकरकमी भरल्यास ७५ टक्के सूट मिळणार आहे.
अभय योजनेद्वारे कराच्या जास्तीत जास्त रक्कम डिसेंबरपर्यंत प्राप्त झाल्यास त्याचे नियोजन कोविड १९ च्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता व महापालिकेत सद्यस्थितीत सुरु असलेल्या विकास कामांकरीता करता येईल. यामुळे महापालिकेच्या विकास कामांना चालना मिळेल. तसेच उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीत अभय योजनेमुळे करदात्यांना दिलासा मिळणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
502 total views, 1 views today