देशात कोरोना महामारीमुळे मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखित झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात समाधानाची भावना

१० ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख


मुंबई : अरे तू वेडा झाला आहेस का ? तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का ? डोक्यावर पडलास का ? ही वाक्ये ऐकलेली अथवा रोजच्या संभाषणात वापरलेली नाही अशी  एकही व्यक्ती सापडणार नाही. समोरच्याने काही चुका केल्या, थोडस वेडंवाकडं वागला की लगेच आपण त्याच्या अथवा तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याची जाणीव संबंधित व्यक्तीला करून देत होतो परंतु गेल्या सहा महिन्यात डोक्यावर परिणाम का होतो ? म्हणजेच मानसिक स्वास्थ का बिघडते याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला आहे. आज कोरोना महामारीमध्ये मानसिक स्वास्थ्याचे महत्व नक्कीच अधोरेखित झाले आहे. दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता पसरवण्याचा व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. शरीर व मन ही आपल्या जीवनाची दोन चाके आहेत यापैकी एकही चाक जर अडखळत असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच त्रास होतो. भारतात दुर्दैवाने मानसिक स्वास्थाबद्दल नागरिकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जागरुकता झालेली नाही. आपल्या शरीरावर कुठं साधे खरचटले तर आपण लगेच त्यावर उपचार करून ते बरे करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या मनावर काही आघात होत असतील तर मात्र आपण यावर कोणतेही उपचार करण्याचा प्रयत्न करीत नाही. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्व सांगताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे  म्हणाले,” गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली तसेच जीवघेण्या स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी पाळण्यातील बाळापासून वयोवृद्धांपर्यंत, चार भिंतीत वावरणाऱ्या गृहिणी पासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या सहा महिन्यापासून  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच एका मानसिक तणावाखाली वावरत आहे, आज लॉकडाउन उठल्यानंतर मिशन बिगिन अगेन सुरु झाले परंतु आजही प्रत्येक व्यक्ती या महामारीच्या संकटाखाली मानसिक दृष्टया दडपली
जात आहे, कोणाची नोकरी गेली आहे तर कोणाच्या नोकरीवर टांगती तलवार आहे तर अनेकांचे उद्योग बंद झाले आहेत, कोणाच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे, पैशाने सधन असणारी माणसे सुद्धा आपल्या प्रियजनांच्या जाण्यामुळे मानसिक ताणतणावाखाली वावरत आहेत, कोरोनावर लस येण्यास बराच अवधी आहे तोपर्यंत आपल्याला ही लढाई लढायची आहे व या लढाईत मानसिक आरोग्य हे फारच महत्वाचे आहे. वैद्यकीय निकषानुसार एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक हे मनोरुग्ण असतात, परंतु कोरोना महामारीमुळे हे प्रमाण वाढत आहे. आत्मविश्वास कमी असणाऱ्या, लहानपणापासून हिंसा, उपेक्षा, शोषण, गरिबी झेलणाऱ्या व्यक्ती नैराश्याने त्रासलेल्या असतातच परंतु कोरोना संकटात  उदासीनता, सततची निष्क्रियता, कामातील रुची कमी होणे, स्वभाव चिडचिड किंवा संशयी होणे, शांत झोपेचा अभाव, भूक कमी होणे, सतत नकारात्मक विचारांचा प्रभावाखाली राहणे, मूड बदलत राहणे ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे जर दुर्लक्ष केले तर आत्महत्या करणे, दुसऱ्याला दुखापत करणे तसेच कायमस्वरूपी निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती असते, अशावेळी मनोविकारतज्ञाचा सल्ला घेणे फारच महत्वाचे आहे. सध्या शहरी भागात प्रवेश रखडल्यामुळे  १०वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे  प्रमाण वाढले आहे. त्यानंतर २१ ते २५ वयोगटातील युवा वर्ग त्यात भरडला जात आहे. कोरोनामुळे आलेली बेरोजगारी, पुढील शिक्षण तसेच काही घरगुती अडचणींमुळे या वर्गाला मानसिक आजाराने ग्रासले आहे. आज कोरोना महामारीमुळे व सोशल मिडियाच्या प्रभावामुळे अनेक नागरिक स्वतःहून उपचार करण्यास समोर येत आहे, कोरोना महामारीमुळे आपल्या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले असले तरी या महामारीमुळे मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखित झाल्याचे नक्कीच समाधान आहे.”
प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्या होते आणि जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींच्या आत्महत्या होतात. त्यातच भारत हा आत्महत्यांमध्ये  नंबर वन असून, दरवर्षी भारतात सुमारे अडीच लाख व्यक्तींच्या आत्महत्या होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे १५ ते ३० या वयोगटांत आत्महत्या हेच मृत्युचे प्रमुख कारण आहे आणि तब्बल ८० टक्के आत्महत्या या मानसिक विकारातूनच होतात, हेही स्पष्ट झाले आहे. महत्वाचे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या आपण थांबवू शकतो आणि त्यासाठीच आपल्या जवळच्यांना योग्य वेळी आधार देत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी दिली.

 546 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.