पनवेल वाशी मार्गावर केडीएमटीची बस सेवा सुरु करा

मनसेची केडीएमटी परिवहन व्यवस्थापकांकडे केली मागणी   
 
कल्याण : लॉकडाऊनमुळे रेल्वेची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने कल्याण मधील नोकरदार नागरिकांना एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र एसटी मध्येही गर्दी होत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परिवहन विभागाची बस सेवा पनवेल आणि वाशी मार्गावर सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यानंतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचार्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक मध्ये बहुतांश कार्यालये सुरु झाल्याने याठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांना आपले कार्यालये गाठण्यासाठी एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र एसटी मध्ये नागरिकांची खूप गर्दी होत असून वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा वेळ देखील वाया जात आहे. कल्याण मधून नवी मुंबई, ठाणे, पनवेल याठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने केडीएमटीची परिवहन बस सेवा पनवेल आणि वाशी मार्गावर सुरु करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्याकडे केली आहे.
  दरम्यान पनवेल मार्गावर सोमवार पासून ३ बस सुरु करणार असून वाशी बस दोन आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी दिले आहे. यावेळी विभाग अध्यक्ष काजीम शेख, योगेश रोकडे, अर्षद शेख आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

 288 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.