सराईत मोबाईल चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी केली अटक


बाईकसह १२ मोबाईल केले हस्तगत
कल्याण : मोबाईलवर बेसावधपणे बोलत असणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल खेचून पळ काढणाऱ्या सराईत मोबाईल स्नॅचरला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे तब्बल १२ मोबाईल आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी महागडी बाईकही हस्तगत करण्यात आली आहे.
धनंजय निवृत्ती पाटील (२२) असे या आरोपीचे नाव असून तो पडघा येथील रहिवासी आहे. रस्त्यावर किंवा गाडीवर बेसावधपणे मोबाईलवर बोलत असणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल खेचून तो धूम ठोकायचा. विशेष म्हणजे या गुन्ह्यासाठी तो २०० सीसीची केटीएम या महागड्या बाईकचा वापर करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
 या आरोपीकडून खडकपाडा पोलिसांनी अशाच प्रकारे चोरलेले १२ मोबाईल हस्तगत केले असून मोबाईल चोरीचे ८  गुन्हे उघडकीस आणले असून या ८ पैकी ५ गुन्हे हे खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर उर्वरित कोळसेवाडी, रामनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे आहेत. या चोरलेल्या मोबाईलची किंमत १ लाख ६५ हजार रुपये इतकी आहे. सदरची कारवाई खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक निरीक्षक प्रितम चौधरी, पोलीस हवालदार चव्हाण, देवरे, पोलीस नाईक राजपूत, पोलीस शिपाई, आहेर, कांगरे, थोरात, जाधव यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिचे चुंबन घेऊन पळून गेलेल्या आरोपीला तब्बल पाच महिन्यांनी अटक केली आहे. १४ मे रोजी हि तरुणी रस्त्यावरून जात असतांना एका व्यक्तीने तिला बाईकवर लिफ्ट दिली व तिला शहाड  परिसरात सोडून जात असताना तिचे चुंबन घेतले. य प्रकरणाचा तपास सुरु असतांना कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन अफसर शेख याला तब्बल ५ महिन्यांनी अटक केली आहे. या तपासाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.  

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.