घोडबंदर रोड वासीयांची तहान आता भागणार

भाजपाच्या प्रयत्नांनंतर १० दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय

ठाणे : घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडून सातत्याने लक्ष वेधण्यात आल्यानंतर, घोडबंदर रोडवरील रहिवाशांसाठी स्टेम प्राधिकरणामार्फत वाढीव १० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. त्याचबरोबर कोलशेत येथील भूमिपूत्रांना नवी घरे व घरदुरुस्तीला परवानगी देण्याबाबत १२ ऑक्टोबर रोजीच्या न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे, कविता पाटील, अर्चना मणेरा, कमल चौधरी यांच्यासह ब्रह्रांड, हिरानंदानी इस्टेट, वसंत लिला, विजय नगरी हौंसिग फेडरेशन व कोलशेत ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, पातलीपाडा व डोंगरीपाडा येथील नागरीकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त शर्मा यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले.
लॉकडाऊनच्या काळापासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हजारो घोडबंदर रोडवासियांचे हाल होत आहे. सद्यस्थितीत ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरलेली आहेत. मात्र, घोडबंदर रोडवासियांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी घोडबंदर रोडला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे अतिरिक्त १० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आजच प्रस्ताव पाठविण्यात आला. या भागातील पाणीवितरणातील त्रूटी दूर करण्याचेही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले.
कोलशेत येथील एअर स्टेशनने लादलेल्या निर्बंधांमुळे भूमिपूत्र रहिवाशांचे हाल होत असल्याकडेही आयुक्तांचे लक्ष वेधले. कोलशेत एअर स्टेशनच्या हेलिपॅडपासून कि संरक्षक भिंतीपासून १०० मीटरपर्यंत बांधकामबंदी असावी, याबाबत १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयाचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आयुक्त शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले.

 422 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.