केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार


दलित अत्याचाराविरुद्ध   कधीही आवाज न उठविणाऱ्या संजय राऊत यांना “आम्हाला शिकवू नये ” असा दिला सल्ला

नट्यांच्या घोळक्यात नाही कार्यकर्त्यांच्या घोळक्यात वावरणारा आणि दलित अत्याचाराविरुद्ध लढणारा मी मूळ पँथर आहे  – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजपर्यन्त कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथर च्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये असा जबरदस्त भीमटोला देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता त्याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे की संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही.मी नटींच्या घोळक्यात नसती मी मात्र  नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचे  रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
हाथरस ची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरस च्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला.आंदोलन केले.लखनौला जाऊन उत्तर प्रदेश च्या राज्यपालांना भेटलो. हाथरस ला भेट देण्यास जाताना तेथिल जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी २ ऑक्टोबर ला हाथरस जाऊ शकलो नाही आता मात्र उद्याच हाथरस ला जाऊन पीडित बळीत दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा ना रामदास आठवले यांनी केला.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एव्हढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फसण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे.कंगना राणावत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातुन मी त्यांच्यावर नाराज नाही.ते माझे मित्र आहेत. पायल घोष ही अभिनेत्री महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे त्यातून आम्ही तिची बाजू घेतली संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत.दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामना मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही.दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का?असा सवाल  रामदास आठवले यांनी केला आहे.

 310 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.