अन विधानसभाध्यक्ष नानासाहेब पटोळे यांनी सानिकाला दिलेला शब्द पाळला

पितृवियोगाचे दुःख बाजूला ठेवून शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या सानिका पवारचे घरी जाऊन केले अभिनंदन

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे शालांत परीक्षा. ही परीक्षा सुरू असतानाच वडिलांनी विहिरीत उडी मारत आपले आयुष्य संपवुन टाकले. पितृवियोगाचे हे दुःख पचवून तिने शालांत परीक्षा दिली आणि त्यात स्पृहणीय यशही मिळवले. तिच्या या यशाची माहिती मिळताच, मी घरी येऊन तुझे अभिनंदन करेल असा शब्द विधानसभाध्यक्ष नानासाहेब पटोळे यांनी तिला दिला. त्याप्रमाणे नानासाहेब पटोळे यांनी तिचे घरी जाऊन अभिनंदन करत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. हि कहाणी आहे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी या गावात राहणाऱ्या सानिका सुधाकर पवार हिची .
सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सुधाकर पवार यांनी परिस्थितीसमोर हात टेकत विहरीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. नेमका त्याचदिवशी सानिकाचा संस्कृत विषयाचा पेपर होता. वडिलांचे पार्थिव घरात असताना मन खंबीर ठेवत सानिकाने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही तिने दुःख बाजूला ठेवत उर्वरित सर्व पेपर दिले. वडील गमावल्याचे दुःख असणाऱ्या सानिकाला शालांत परीक्षेच्या निकालाने चांगली उभारी दिली. या परीक्षेत सानिकाने तब्बल ९८ टक्के गुण मिळवून एक प्रकारे आपल्या वडिलांना आदरांजली वाहिली. सानिकाच्या या यशाची माहिती आपले निकटवर्तीय अनिल झोडगे व संदीप ओंबासे यांच्याकडून मिळताच विधानसभाध्यक्ष नानासाहेब पटोळे यांनी तिच्याशी संपर्क साधल्यावर सानिकाने अभिनंदन करण्यासाठी घरी या असे सांगून मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी बोलताना मी घरी येऊन अभिनंदन करेल असे वचन नानासाहेब पटोळे यांनी सानिकाला दिले. कोरोनाच्या महामारीत वाढलेले लॉकडाउन त्यात खुद्द विधानसभाध्यक्षांना झालेली या रोगाची बाधा, त्यामुळे भेटीचा योग येत नव्हता. आता सर्वकाही हळूहळू रुळावर येत असताना दिलेल्या वचनाप्रमाणे नानासाहेबांनी थेट यवतमाळ गाठून सानिकाच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केलेच आणि तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलत तिला आश्वस्त केले. या भेटीदरम्यान   अनिल झोडगे व संदीप ओंबासे यांच्या सहकार्याने एक लाख पाच हजार रकमेचा डिमांडड्राफ़ट नानासाहेब पटोळे यांच्या हस्ते सानिकाला देण्यात आला. याशिवाय नानासाहेब पटोळे करणार असणारे सहाय्य देखील काही दिवसात सानिकाकडे पोहचणार आहे.

 371 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.