या आठवड्यात एस.टी कर्मचाऱ्यांना मिळणार एका महिन्याचा पगार

उरलेल्या पगाराबाबत चर्चा करून निर्णय- परिवहन मंत्री परब यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी फक्त वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी आर्थिक चक्रात अडकले. यापार्श्वभूमीवर मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. अखेर यातील एका महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. तरीही अनेक कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. विनावेतन काम करत असल्याने त्यांच्या कार्यशैलीवरही परिणाम होत आहे तर अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. त्यातच आता लॉकडाऊनच्या शिथिलीकरणास सुरुवात झाल्याने एसटीने लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु केल्या. मात्र अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवासीच मिळत नाहीत. त्यामुळे या बसेस पुन्हा एकतर बंद कराव्या लागत आहेत. तर काही मार्गावर रिकाम्याच चालवाव्या लागत आहेत.
यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या एक महिन्याच्या पगारासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच हा एक महिन्याचा पगार पुढील आठवड्यातील गुरूवार पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले. तर उर्वरित थकित पगारासाठी पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.