ठाणे जिल्हा परिषदे मार्फत ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे वाटप

१४ लाख ८८ हजार १३७ नागरिकांना वाटप

ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न

ठाणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे वाटप करण्यात येत आहे. १४ लाख ८८ हजार १३७ नागरिकांना हे औषध वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात वाटपाचे काम सुरु आहे.
ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण जनतेला रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० औषध १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या शिल्लक रक्कमेतून खरेदी करण्याच्या सूचना होत्या. तसेच याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील सर्व जिल्हा परिषदांना औषध खरेदी करून संपूर्ण जनतेला औषध वाटप करण्याचे निर्देश दिले होते. ठाणे जिल्हा परिषद या निर्देशाची अमलबजावणी करीत आहे. आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या  होमियोपॅथिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या आहेत. शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी या पाचही तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम काळात या औषधाचे वाटप करण्यात येत आहे. औषध वाटपाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सन्मानीय आमदार, जिल्हा परिषदेचे सन्मानिय विषय समिती सभापती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या उपस्थित गावोगाव या औषधांचे वाटप केले जात आहे. 
नागरिकांनी या  गोळ्या कशा घ्याव्यात याबाबतच्या सूचना आयुष मंत्रालयाने दिल्या आहेत. यामध्ये या गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा, असे तीन दिवस सलग सेवन करावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा. असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.