रस्ता रुंदीकरणातील शेकडो बाधीत मागील चार वर्षांपासून पुन:र्वसनाच्या प्रतिक्षेत

शानू पठाण यांनी दिल्या आयुक्तांना ताबापत्राच्या तसबिरी
ठाणे : सन २०१६ मध्ये मुंब्रा-कौसा भागात रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते. या रस्तारुंदीकरणामध्ये मैदान-बाग, घरे आणि दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आज या कारवाईला ४ वर्षे झाली आहेत. मात्र, या सर्व बाधीतांना ताबापत्र देऊनही अद्यापही त्यांचे पुन:र्वसन करण्यात आलेले नाही. त्या निषेधार्थ ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी ताबापत्रांच्या तसबिरी तयार करुन आयुक्तांना देत अनोखे आंदोलन केले.
मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम २०१६ मध्ये करण्यात आले होते. या काळात रस्त्यालगत असलेले बगिचे, मैदाने, शेकडो घरे आणि दुकाने जमिनदोस्त करण्यात आले. मात्र, अद्यापही त्यांचे पुन:र्वसन करण्यात आलेले नाही. या सर्व बाधीतांना कौसा मार्केटमध्ये गाळे देण्याचे मान्य करुन तसे ताबापत्रही देण्यात आले होते. मात्र, या दुकान-घरधारकांना अद्याप प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही. बाधीतांना न्याय मिळावा, यासाठी शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा प्रभाग समितीच्या सभापती आशरीन राऊत, नगरसेविका फरजाना साकीर शेख यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय गाठून ताबापत्राच्या फ्रेम( तसबिरी) तयार करुन आयुक्तांना दिल्या.
या संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, मुंब्रा भागातील लोक अगदीच छोट्या घरांमध्ये राहतात. त्यांना विरंगुळ्यासाठी एकमेव स्टेडीयमचा आधार होता. या स्टेडियममध्ये जाऊन मोकळी हवा घेता येत होती. मात्र, रस्ता रुंदीकरणात मैदाने-बागा तोडण्यात आलेल्या असल्याने अन् स्टेडियम कोविड सेंटर तयार करण्यात आलेले असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी कोणताही आधार उरलेला नाही. तसेच, दुकाने आणि घरे तोडूनही त्यांचे पुन:र्वसन करण्यात आलेले नसल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. जर, लवकरात लवकर या बाधीतांचे पुन:र्वसन करण्यात आले नाही. तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.