किसान सभेतर्फे २१ जिल्ह्यात शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन

रास्ता रोको, कायद्याची होळी ५० हजार शेतकरी झाले सहभागी

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत ५० हजार शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन, कायद्यांची होळी करण्यात आली. आज २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांत ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने वा उग्र निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारच्या तिन्ही शेतकरीविरोधी कायद्यांची होळी केली.
ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी रस्ता रोकोचे जोरदार आंदोलन झाले व या चार जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या ३० हजारांहून अधिक होती. पालघर जिल्ह्यात चारोटी, ता. डहाणू, आणि बोईसर फाटा, ता. पालघर या दोन्ही ठिकाणी मुंबई-बडोदा-जयपूर-दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग १० हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे, उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार व धुळे, विदर्भात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर, आणि मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, जालना व उस्मानाबाद येथील अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली.
ठिकठिकाणच्या आंदोलनांचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य महासचिव डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख आणि राज्य पदाधिकारी बारक्या मांगात, रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील मालुसरे, शंकर सिडाम, सिद्धप्पा कलशेट्टी, दादा रायपुरे, यशवंत झाडे, नामदेव भांगरे, सदाशिव साबळे इत्यादींनी केले.

 363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.