तुमचे प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा

     
आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांना  मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.
शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वंयसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजूरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वंयसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वंयसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासननिर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व मोबदला मिळणार आहे.
केंद्र शासनाकडे मागणी
याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.
माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करतांना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तो पर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पुर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वंयसेवक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेतांना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

 393 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.