टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात सापडल्या अळ्या

रुग्णांनी सगळा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला

कल्याण :  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांनी याबाबत कोव्हिड सेंटरमधील महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. रुग्णांनी हा सगळा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तत्काळ हे जेवण बदलण्यात आले असून याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.   
टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण दिलं जात असल्याचा आरोप याआधी देखील करण्यात आला आहे. बुधवारी रात्री याठिकाणी देण्यात आलेल्या जेवणातील सोयाबीनच्या भाजीत अळ्या सापडल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत दररोज जवळपास ५०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.  असे असतांना महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारं जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कल्याण नजीकच्या भिवंडी बायपास रोडजवळ असलेले टाटा आमंत्रा हे कोविड सेंटर एप्रिल महिन्यापासून सुरु केले आहे. यामध्ये क्वारंटाइन पेशंट आणि कोविड पॉझिटिव्ह पेशंट दोन वेगवेगळ्या इमारतीमध्ये ठेवण्यात येतात. याठिकाणी दर्जेदार जेवण देण्याचा पालिकेचा प्रयत्न असतो. बुधवारी जेवणामध्ये अळी सापडल्याची तक्रार प्राप्त  झाल्यानंतर तत्काळ हे सर्व जेवण बदलण्यात आलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून संबंधित कंत्राटदाराला सक्त ताकीद देण्यात आली आहे. ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी केले आहेत त्याचीही चौकशी करत असून आवश्यकता वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले जाईल अशी प्रतिक्रिया पालिका सचिव संजय जाधव यांनी दिली.     

 469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.