रस्ताने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता मिळणार विम्याचे सुरक्षा कवच

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला यापुढे विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयांतर्गत अपघातात मरण पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना किंवा अपघातात जखमी होणाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यात बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल.
या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरी देखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मरण पावतात. यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.
या योजनेत पहिल्या ७२ तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही. या योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोलफ्री क्रमांक देखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

 397 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.