परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे नियमन करा

मनसेने केली पालिका आयुक्त आणि महात्मा फुले पोलीस स्थानक, बाजारपेठ पोलीस स्थानक आणि खडकपाडा पोलीस स्थानकांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

कल्याण : कल्याण शहरात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे नियम करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी पालिका आयुक्त आणि महात्मा फुले पोलीस स्थानक, बाजारपेठ पोलीस स्थानक आणि खडकपाडा पोलीस स्थानकांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून परराज्यातून बस, जीप आणि इतर खाजगी वाहनांमधून अनेक परप्रांतीय कल्याण शहरात प्रवेश करत आहेत. हि खाजगी वाहने मध्यरात्रीनंतर कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधारी पूल, शहाड चौकमार्गे शहरात प्रवेश करत आहेत. या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी होत नाही. सदर प्रवाशांचे आगमन आणि गंतव्य स्थान याबाबत अनभिज्ञता असल्याने कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाचा अभाव असून शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला हातभार लावत आहे.
या प्रवाशांचे आगमन आणि गंतव्य स्थान याबाबत अनभिज्ञता असल्याने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने देखील चिंतेची बाब आहे. हे प्रवासी प्रामुख्याने रोजगारासाठी शहरात प्रवेश करत असून हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांची नोंदणी बंधनकारक आहे. कल्याण मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण ठेवणे अथवा आवश्यकतेनुसार निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्यामुळे या संदर्भात विशेष लक्ष देऊन शहराच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी केली आहे. याबाबत मनसेतर्फे पोलीस प्रशासन आणि महापालिकेस सहकार्य करण्याचे आश्वासन देखील पवार यांनी दिले आहे.
तर परराज्यातून रात्री आणि दिवसा देखील लोंढेच्या लोंढे येत असून हे कल्याण शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. राज्य सरकारने करोडो रुपये खर्च करून या लोकांना त्यांच्या गावी रवाना केलं होतं. आता महिन्याभरात हे लोकं परतत असल्याने हा खर्च देखील एक प्रकारे वाया गेले आहेत. सरकार शहरात राहण्यारया नागरिकांना एकीकडे कठोर नियम लादत असतांना त्यांच्यावर कुठलेही अंकुश नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी व्यक्त केली आहे.

 594 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.