कोविडमुक्त कल्याण डोंबिवलीसाठी प्रयत्नशील – पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण : माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत कोविडमुक्त कल्याण डोंबिवलीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून याअंतर्गत ४ लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. २५ दिवसांत ४०० टीमच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
कोविड १९ चा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतांना शासन स्तरावर, महापालिका स्तरावर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक प्रयत्न होत आहेत. कोविड-१९ वर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ही मोहिम राबविण्यात येत असून कल्याण डोंबिवली मध्ये देखील हि मोहीम राबवली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष अशासकीय संस्थाच्या (एन.जी.ओ.) सहाकार्यान व सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पध्दतीचा अंगिकार करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे.
ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महापालिकेमार्फत सुमारे ४०० पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत देण्यात आलेले २ स्वयंसेवक व महापालिकेचा १ आरोग्य कर्मचारी यांचा अंतर्भाव असेल. सदर पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. मोहिमेच्या एकुण कालावधीत सदर पथके कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक घरी दोन वेळा भेटी देतील. या भेटीमध्ये घरातील सर्व व्यक्तींना वैयक्तिक, कौटूंबिक, सोसायटी व वसाहतीमध्ये वावरतांना, दुकाने, मंडया,मॉल्समध्ये खरेदी इ., कार्यस्थळी व कार्यालयांमध्ये घ्यावयाची खबरदारी तसेच खाजगी,सार्वजनिकरित्या प्रवास करतांना घ्यावयाची दक्षता या संदर्भात माहिती तथा मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रथम फेरीतील १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत गृह भेटीमध्ये सदर पथक घराच्या दरवाजाबाहेर स्टीकर लावेल. घरातील प्रत्येक सदस्यांची अॅपमध्ये नोंद करेल आणि घरातील सर्व सदस्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी (SPO2), अती जोखमीचे (कोमॉर्बिड),SARILI ची लक्षणे असलेल्या व्यक्ती ओळखून त्याना संदर्भिय सेवा आणि उपचार दिले जातील. दुसऱ्या फेरीतील १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान गृहभेटीमध्ये प्रत्येक पथक ७५ ते १०० घरांना भेटी देतील आणि सर्वांचे तापमान व ऑक्सिजन पातळी(SPO2) तपासून घरातील कोणाला दरम्यानच्या काळात मोठा आजार होऊन गेला आहे काय, याची खात्री करतील. तसेच एखादया व्यक्तिचे तापमान ३८.०० पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि ऑक्सिजन पातळी (SPO2) ९४ % पेक्षा कमी असल्यास रुग्णांस संदर्भित करतील पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असलेल्या घरातील व्यक्तींची Comorbid Condition साठी चौकशी करतील व त्याची नोद घेतील.
महानगरपालिकेमार्फत सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरिक यांनी “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच कोविड मुक्त कल्याण डोंबिवलीसह कोविडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महानगरपालिकेस आणि महापालिकेच्या पथकांना सर्व प्रकारची माहिती पुरवून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
560 total views, 1 views today