वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न एकाच बैठकीत निकाली

म्हाडामार्फत होणार पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास, ५६७ सदनिका पोलिसांना देण्यात डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा पुढाकार

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे ५६७ घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न डॉ. आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावल्याने सबंध पोलीस दलातून डॉ. आव्हाड यांचे आभार मानले जात आहेत.
१९७३ मध्ये म्हाडाने ठाणे पोलिस आयुक्तालयाला ८५६ सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या ४६ वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलिस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या समोर हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी मंगळवारी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वर्तक नगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुन:र्वसन करण्याचे आदेश दिले. म्हाडाने पोलिस वसाहतीचा पुनर्विकास करीत त्यावर पोलिसांना ५६७ घरे मोफत बांधून द्यावीत आणि उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाने वितरीत करावीत, असे आदेशही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्‍या पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचा चंग डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बांधला होता. त्यांचे हे प्रयत्न आता प्रत्यक्षात साकारले जाणार आहेत. या वसाहतीमध्ये निवृत्त पोलिसांनाही घरे मिळणार असल्याने पोलीस दलातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 412 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.