माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज

गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण या चतू:सूत्रीचा करणार वापर

ठाणे : कोव्हीड १९ या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण या चतू:सूत्रीचा वापर केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन परिषद जिल्हा अध्यक्ष सुषमा लोणे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.
१५ सप्टेंबर  ते १० ऑक्टोबर  आणि १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर  या दोन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, भिवंडी या पाच तालुक्यातील ३३  प्राथमिक आरोग्य केंद्रस्थानी धरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

पथकांची निर्मिती
मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या नेतृत्वाखाली घर सर्वेक्षण कृती आराखडा तयार करून पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक घरी भेट देऊन थर्मल स्कॅनर द्वारे कुटुंबातील प्रत्येकाचे तापमान आणि प्लस ऑक्सिमीटरणे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मोजतील. या दरम्यान कोणी कोव्हीड संशयित असेल त्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करतील. तसेच मधुमेह, ह्रदय विकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या अतिजोखीम गटातील व्यक्ती शोधून काढणे, व त्यांची काळजी घेणे, तसेच त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार करणे याचाही अंतर्भाव या मोहिमेत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या पथका मार्फत प्रत्येकाला आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश दिला जाणार आहे. पथकातील प्रत्येकजण कोव्हीड १९ चे सर्व नियम पाळून गृहभेटी देतील. ही मोहीम जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य,स्थानिक लोकप्रतिनधी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.